पनवेल दि.०५ (संजय कदम) : ओलाचालकाच्या कारला कट मारून त्याला शिवीगाळ करुन त्याच्या खिशातील पाकीट व कारमधील दोन मोबाईल फोन जबरीने काढून घेणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासात अटक केली आहे. सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात खुन, दरोडा, दरोडयाची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दुखापत, सरकारी नोकरास दुखापत, अवैध शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणातील फिर्यादी राजन पारस चौधरी (वय २२, रा.मुंबई) ह्यांच्या गाडीत नेवाळी येथून तिघे जण डोंबिवली येथे जाण्यासाठी बसले. डोंबिवली येथील घारडा सर्कल येथे आले असता त्यांच्या कारला एका रिक्षाने कट मारून रिक्षा कारच्या पुढे उभी केली. रिक्षातुन दोन इसम खाली उतरुन ते फिर्यादी यांना शिवीगाळ करुन त्यांच्या खिशाची तपासणी करु लागले.
त्यानंतर कारमध्ये बसलेले इतर तीन इसमांसह या पाचही आरोपींनी फिर्यादीला मारहाण करुन त्यांचे पॅन्टचे खिशातील पाकीट व कारमध्ये ठेवलेले त्यांचे दोन मोबाईल फोन जबरीने काढुन घेऊन रिक्षातुन पळुन गेले. सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन मानपाडा पोलीस ठाणेचे वपोनिरी. शेखर बागडे यांनी तात्काळ गुन्हे शाखेचे पोनिरी बाळासाहेब पवार, सपोनिरी सुरेश डाबरे, सपोनि अविनाश वनवे, सपोनि सुनिल तारमळे, सपोउपनि भानुदास काटकर, पोहेकॉ विकास माळी, पोहेकॉ सुनिल पवार, पोहेकॉ संजय मासाळ, पोहेकॉ गिरीश पाटील, पोकॉ अशोक आहेर, पोकों विजय आव्हाड यांचे वेगवेगळे टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले. सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी आरोपी चंद्रकांत उर्फ मोठा चट्या जमादार, शिवा तुसंबल, सत्यप्रकाश कनोजिया यांना अटक केली
. यासोबत एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले असून एका आरोपीचा शोध चालु आहे. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात चोरलेली रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच इतर गुन्हयात चोरलेले एकंदर ९ मोबाईल फोन, ०१ लॅपटॉप, रोख रक्कम, गुन्हयात वापरलेली रिक्षा असा एकुण २ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी चंद्रांकांत जमादार हा तडीपार असून त्याच्यासह इतर आरोपींवर डोंबिवली, टिळकनगर, खडकपाडा, हिललाईन पोलीस ठाणेत खुन, दरोडा, दरोडयाची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दुखापत, सरकारी नोकरास दुखापत, अवैध शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
Tags
पनवेल