आगामी सणासुदीच्या काळामध्ये ग्रामस्थांनी जागरूक राहणे महत्वाचे - वपोनि अनिल पाटील







पनवेल दि.०३ (संजय कदम) : आगामी काळामध्ये महावीर जयंती, हनुमान जयंती, गुड फ्रायडे, ईस्टर संडे, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, अक्षय तृतीया,रमजान ईद आदी सण येऊ ठेपले असून हे सण उत्साहात साजरे करताना ग्रामस्थांनी परिसरात वावरताना जागरूक राहावे असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी त्यांच्या हद्दीतील सरपंचासह इतर ग्रामस्थांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केले. 




                 यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक जगदीश शेजकर, गोपनीय विभागाचे अधिकारी राजेंद्र कुवर, पंकज शिंदे आदींसह पनवेल तालुका हद्दीतील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामस्थ व विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले कि, आताच्या काळामध्ये गावातील मुख्य रस्त्यावर, चौकात, बाजारपेठेत, प्रवेशद्वार या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येतात. तसेच गावात अनोळखी व्यक्ती किंवा वाहने आल्यास त्याची माहिती सुद्दा पोलिसांना मिळते. यातूनच गुन्हा घडल्यास तो उघडकीस सुद्दा येतो. गावामध्ये बेकायदेशीररित्या देशी-विदेशी मद्यसाठा किंवा विक्री करण्यात येत असेल तर त्याची माहिती मला प्रत्यक्ष फोनवर कळवावी यासाठी कोणतीही भीती बाळगू नये, महिला वर्गांसाठी पोलीस ठाण्यामध्ये वेगळा कक्ष उभारण्यात आला आहे. 




तेथील अधिकारी सुद्धा महिला असल्याने महिलांनी आपल्या तक्रारी न घाबरता द्यावा तेथे आपल्या तक्रारींचे निराकरण करता येईल. तसेच आपल्या हद्दीमध्ये असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी सर्वांनी घ्यावी. त्यांच्यासाठी व सर्वांसाठी पोलिसांमार्फत ११२ क्रमांक हा चोवीस तास उपलब्ध असतो. कुठलीही दुर्घटना किंवा मदत भासल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा. आगामी सणामध्ये मिरवणुकीला डीजेचा वापर करू नये, शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्थीप्रमाणे सण साजरे करावेत असे आवाहन त्यांनी केले आहे. 



चौकट - थेट केला गटविकास अधिकाऱ्याशी संपर्क
गावागावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरांचे जाळे उभारण्यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी उपस्थित सरपंच व इतर पदाधिकाऱ्यांना आवाहन केले. यावेळी उपस्थित सरपंचांनी गटविकास अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घातल्यास व तसे आदेश ग्रामसेवकांना दिल्यास काही महिन्यातच संपूर्ण गावामध्ये सीसीटीव्ही शासनामार्फत उपलब्ध होतील अशी माहिती त्यांनी दिल्यावर त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी सर्वांसमोर पनवेलचे गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.



थोडे नवीन जरा जुने