पनवेल दि.०४ (संजय कदम) : उन्हाची काहिली कमी करणारे थंड, मधुर, रसदार फळ. सध्या ऊन दिवसेंदिवस वाढत असताना पनवेल शहरामध्ये ताडगोळे, जांभूळ आणि शहाळ्यांना मागणीही वाढत आहे. उन्हाच्या काहिलीमध्ये तहान भागवण्यासाठी देखील या फळाचा वापर होतो. त्यामुळे सद्यस्थितीत या फळांना मागणी वाढली आहे. सध्याच्या धार्मिक उपवासाच्या दिवसांमुळे या फळांना चांगली मागणी असल्याने त्यांचे दर वधारले आहेत.
पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ताडगोळ्याची झाडे आहेत. उन्हाळ्यामध्ये ताडगोलाच्या विक्रीतून स्थानिकांना चांगले पैसे मिळतात. तर शहरी भागामध्ये ताडगोळ्यांना चांगली मागणी आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबत, उसाचा रस, कैरीचे पन्हे, शहाळे असे अनेक पर्याय उपलब्ध असतात. काहींना थंडगार पेय, आईस्क्रीमचा मोह देखील असतो. मात्र यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक थंडावा देणारी फळे व पेयाकडे नागरिकांचा कल असतो. शरिराचा दाह कमी करण्यासाठी ताडगोळ्यांचा पर्याय देखील निवडला जातो. सध्या हेच ताडगोळे शहरातील रस्त्यांवर दिसत आहे. तर नागरिक देखील ताडगोळे खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत.
त्याचप्रमाणे बाराही महिने बाजारात दिसून येणाऱ्या शहाळयाला उन्हाळ्यात जास्त मागणी असते. शहाळ्याचे पाणी उष्णतेवर अधिक परिणामकारक असल्याने त्याचा अधिक वापर होत असतो. निव्वळ पाणी असलेले शहाळे २० ते २५ रुपयाला मिळते. मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर व गुणकारी असलेल्या जांभळे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. वर्षातून फक्त उन्हाळ्यातच मिळणार्या जांभळांची नागरिक विशेषतः मधुमेही रुग्ण वाट पाहतात, परंतु ती जांभळे ही चढ्या भावाने विकली जातात. सध्या बाजारात २०० ते २५० रुपये किलो असा जांभुळाचा भाव चालू आहे. त्यातच सध्याच्या धार्मिक उपवासाच्या दिवसांमुळे या फळांना चांगली मागणी असल्याने त्यांचे दर वधारले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
Tags
पनवेल