अज्ञात कारणावरुन तरुणाची हत्याअज्ञात कारणावरुन तरुणाची हत्या
पनवेल, दि.14 (संजय कदम) ः अज्ञात कारणावरुन एका तरुणाची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची घटना पनवेल तालुक्यातील कोन-सावळा रस्त्याच्या बाजूला असलेल्या उतारावर अ‍ॅग्रोवन लॉजिस्टीक कंपनीच्या समोर आज दुपारी घडली आहे.
पनवेल तालुक्यातील कोन-सावळा रस्त्याच्या बाजूला असलेल्या उतारावर अ‍ॅग्रोवन लॉजिस्टीक कंपनीच्या समोर अज्ञात कारणावरुन 25 ते 30 वयोगटातील तरुणाला गंभीररित्या जखमी करून अज्ञात इसमाने ठार मारल्याची घटना घडली आहे. सदर मयत इसमाची उंची 5 फुट 8 इंच, बांधा मध्यम, वर्ण सावळा असून अंगात काळसर राखाडी रंगाचे हाफ टी-शर्ट, टी-शर्टच्या पुढील बाजूस लाल रंगाची पट्टी व त्याजवळ पांढर्‍या रंगाने अर्बन स्टाईल ऑर्थेटींक / डीएनएम एनएक्सटी जनरेशन असे इंग्रजी अक्षरात प्रिंट केलेले आहे. तसेच काळ्या रंगाची कार्गो फुल पँन्ट, पॅन्टच्या खिशाजवळ मँगोज असे प्रिंट केलेले, उजव्या पायात पांढर्‍या रंगाचा शुज आहे. तसेच सदर इसमाच्या गळ्याभोवती लोखंडी साखळी गुंडाळलेली आहे. सदर इसमाच्या दोन्ही हातावर ब्लेडने वार केलेल्या जुन्या जखमा दिसून येत आहेत. तसेच त्याच्या पँन्टच्या खिशामध्ये एक ब्ल्यू ट्युथ व विमलच्या दोन पुड्या व चाव्या आहेत. सदर हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश शेळकर व त्यांचे पथक घटनास्थळी रवाना होवून सदर तरुणाचा खुन कोणत्या कारणावरुन कोणी व कशासाठी केला?

 याबाबतचा तपास सुरू केला आहे. तसेच या संदर्भात कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे दूरध्वनी 27452444 किंवा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश शेळकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने