बीसीए भेंडखळ आयोजित 12 वर्षाखालील लेदर क्रिकेट स्पर्धेत पाचौरी कामोठे संघ ठरला विजेता, अंतिम सामन्यात बीसीए भेंडखळ संघाला केलं पराभूत

बीसीए भेंडखळ आयोजित 12 वर्षाखालील लेदर क्रिकेट स्पर्धेत पाचौरी कामोठे संघ ठरला विजेता, अंतिम सामन्यात बीसीए भेंडखळ संघाला केलं पराभूत
 

उरण दि 29(विठ्ठल ममताबादे )बीसीए भेंडखळ आयोजित 12 वर्षाखालील लेदर क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पाचौरी कामोठे संघाने पटकावले. रविवारी (ता. 28) रोजी ठाणकेश्वर भेंडखळच्या मैदानात रंगलेल्या अंतिम सामन्यात पाचौरी संघाने बीसीए भेंडखळ संघाला 36 धावांनी सहज पराभूत केले. श्रीयश गोवारीचे दमदार अर्धशतक आणि आर्यन शिंदे, मंत्र पाटील दोघांनीही घेतलेले पाच बळी अंतिम सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. 
      नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्यास आलेल्या पाचौरी संघाने छान सुरुवात केली. या स्पर्धेत दोन शतके झळकावलेल्या श्रीयश गोवारीने दमदार अर्धशतक (58 धावा) केले. त्याला अंकित म्हात्रे (48 धावा) आणि विराज पाटील (39 धावा) यांनी साथ केली. कर्णधार मंत्र पाटीलने सुरेख गोलंदाजी करताना 23 धावात 5 गडी टिपले. भाविक पाटील, आयुष मोकल, मानव ठाकूर, आरुष ठाकूर यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत पाचौरी कामोठे संघाला निर्धारीत 35 षटकांत 198 धावांवर रोखले होते. 
      घरच्या मैदानावर बीसीए संघ 199 धावांचे आव्हान पार करेल असं वाटत होते. मात्र पाचौरी संघाच्या अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि अचूक गोलंदाजीने ठराविक अंतराने बीसीए संघाचे फलंदाज बाद होत गेले. मागील 12 सामन्यात चार शतके ठोकणाऱ्या अर्णव पाटीलवर मोठ्या अपेक्षा होत्या. 
मात्र तो 26 धावांवर बाद झाला. अष्टपैलू भाविक पाटील 16 धावांवर धावबाद झाल्यावर धावगती मंदावली. कर्णधार मंत्र पाटील 12, आयुष घरत 32, आरव बरल 16, आरुष ठाकूर 20 यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आल्याने संघाचा डाव 162 धावांवर आटोपला. पाचौरी संघाने अंतिम सामना 36 धावांनी सहज जिंकत विजेतेपद पटकावले. पाचौरी संघाकडून आर्यन शिंदेने 18 धावात 5 तर आदित्य कांटे ने 29 धावात 3 गडी टिपले. सामनावीर आर्यन शिंदे ठरला. बीसीए संघाचा मंत्र पाटील उदयोन्मुख खेळाडू ठरला. अंतिम विजेत्या पाचौरी कामोठे संघाला स्व. रुपम (आर.आर) पाटील स्मृतीचषक तर उपविजेत्या बीसीए भेंडखळ संघाला स्व. सचिन म्हात्रे स्मृतीचषक देऊन सन्मानित करण्यात आले.


    स्पर्धेत दोन शतक, एक अर्धशतकासह सर्वाधिक 298 धावा करणारा श्रीयश गोवारी मालिकावीर, दोन सामन्यात दोन शतके करणारा आरुष कोल्हे उत्कृष्ट फलंदाज ठरला. 6 बळी घेणारा आदित्य पांडें उत्कृष्ट गोलंदाज, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आशीर्व पाटील ठरला.

 या सर्वांना आकर्षक चषक देऊन सन्मान केला. बीसीए अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष मनोज भगत, प्रशिक्षक नयन कट्टा, शरद म्हात्रे, विशाल ठाकूर, एड. पंकज पंडित, स्पर्धा पुरस्कर्ते रोहिदास पाटील, रुपेश पाटील, संजय ठाकूर यांच्यासह डॉ. भूषण पाटील, अमित पाटील, राजाराम मोकल, दत्तात्रेय ठाकूर, निलेश घरत, संदीप तांडेल, केसी बरल आदींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.


थोडे नवीन जरा जुने