नर्सरीत मुलांचे ऍडमिशन घेण्याच्या बहाण्याने नर्सरी चालक महिलेची १ लाखाने फसवणूक







नर्सरीत मुलांचे ऍडमिशन घेण्याच्या बहाण्याने नर्सरी चालक महिलेची १ लाखाने फसवणूक
पनवेल दि.१२ (वार्ताहर) : नर्सरीत मुलांचे अॅडमिशन घेण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने गुगल पे द्वारे अॅडव्हॉन्स पाठविण्याचा बहाणा करून नर्सरी चालक महिलेकडूनच १ लाख रुपये उकळून तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.


           या प्रकरणातील तक्रारदार महिला पनवेल भागात लहान मुलांची शाळा नर्सरी चालवते. नर्सरी चालक महिलेला सायबर चोरट्याने त्याच्या मुलांचे ऍडमिशन करण्याच्या बहाण्याने संपर्क साधला होता. तसेच त्याची पत्नी पनवेलमध्ये राहण्यास असून तो बॉर्डरवर कामाला असल्याचे त्याने तिला सांगितले होते. तसेच त्याची पत्नी उद्या मुलांना घेऊन स्कुलमध्ये येणार असल्याने मुलांची फी अऍडव्हॉन्स मध्ये गुगल पे द्वारे पाठवित असल्याचा बहाणा करुन त्याने सदर महिलेला युपीआय आयडीवरून १ रुपया पाठविण्यास सांगितले. त्यानुसार नर्सरी चालक महिलेने १ रुपया पाठविल्यानंतर सायबर चोरट्याने त्या महिलेला शाळेच्या फी ची संपूर्ण रक्कम पाठविल्यास त्यांना सदर रक्कम डबल करून पाठविण्याचा बहाणा केला.




 त्यानुसार नर्सरी चालक महिलेने सायबर चोरट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला ४८ हजार रुपये पाठवून दिले. मात्र, सायबर चोरट्याने सर्वर डाऊन असल्यामुळे त्यांचे पैसे त्याला मिळाले नसल्याचे सांगून दुसऱ्या आयडीवर पुन्हा पैसे पाठविण्यास नर्सरी चालक महिलेला सांगितले. त्यामुळे या महिलेने आणखी ४८ हजार रुपये त्याला पाठवुन दिल्यानंतर दोन वेळेस ४८ हजाराची रक्कम कट झाल्याचे मेसेज तक्रारदार महिलेला प्राप्त झाले. त्यामुळे नर्सरी चालक महिलेने सायबर चोरट्याला आपले पैसे परत करण्यास सांगितले असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. 



त्यानंतर या सायबर चोरट्याने नर्सरी चालक महिलेला गुगल-पे वर ४००० टाईप केल्यास त्यांचे पैसे परत मिळतील, असे सांगितले. त्यामुळे या महिलेने ४००० टाईप केल्यानंतर तिच्या खात्यातून आणखी ४ हजार रुपये कट झाले. त्यानंतर नर्सरी चालक महिलेने सायबर चोरट्याकडे आपले पैसे परत करण्यास सांगितले. मात्र, त्याने आपला मोबाईल फोन बंद करून टाकला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नर्सरी चालक महिलेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली


.
थोडे नवीन जरा जुने