पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रभागनिहाय नागरी वस्ती तसेच उर्वरित पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात 'समस्यांचा महापूर' ओसंडून चाहत असल्याने नागरी जीवन दयनीय अवस्थेत दिवस ढकलत आहे. तर शहरे आणि ग्रामीण भागाला अवकळा आल्याच्या तक्रारींचा सूर ऐकायला मिळत आहे. यावर नागरिकांना लिहिते, बोलते करून त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पनवेल संघर्ष समितीने लेख आणि छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे. हे सर्व लेख पुढे संबंधित शासकीय यंत्रणेला पाठवून समस्यांचा निपटारा करण्यास साहाय्यभूत ठरतील..
शासनाच्या योजना फक्त कागदावर असून त्यांना शासकीय आणि राजकीय उंदीर कुरतडत असल्याने त्या योजनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही.. पर्यायी, मुंबईच्या कुशीत असलेल्या तिसऱ्या, चौथ्या मुंबईच्या निर्मितीचे डोहाळे लागलेल्या पनवेल परिसरात मूलभूत नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. त्यातच शहरी भागापासून ग्रामीण भागातील रस्ते, पथदिवे, सांडपाण्याचा प्रश्न असो की, आरोग्य सुविधा वेशीवरच टांगलेल्या आहेत. या सर्व घटनांचा धांडोळा घेऊन त्या समस्या लेख आणि छायाचित्रांच्या माध्यमातून एकत्रित केल्या जातील. पुढे त्याचे विभागनिहाय विभागणी करून संबंधित शासकीय विभागाकडून त्या समस्यांचा निपटारा करण्यात येईल. आपला प्रभाग, आपला गाव, आपले शहर समस्यामुक्त व्हावे यासाठी संघर्ष समितीने ही लेख आणि छायाचित्र स्पर्धा ठेवली आहे.
प्रथम क्रमाकाच्या उत्कृष्ट लेखास पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय लेखास तीन हजार रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय लेखास एक हजार व सन्मानचिन्ह तसेच प्रथम क्रमाकाच्या उत्कृष्ट छायाचित्रास अनुक्रमे तीन हजार, द्वितीय क्रमांकास दोन हजार व तृतीय क्रमांकास एक हजाराचे रोख परितोषिक आणि सन्मानचिन्ह देवून समारंभपूर्वक गौरव केला जाईल, याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्यास प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल, असे संघर्ष समितीच्यावतीने तालुकाध्यक्ष डॉ. हेमंत पाटील व शहराध्यक्ष हरेश पाटील यांनी घोषित केले आहे.
पनवेल महापालिकेसह विधानसभा मतदार संघातील नागरी समस्या, वैद्यकीय, बेरोजगारी, औद्योगिक वसाहती आणि त्यातील त्रुटी, क्रीडा धोरणांचा अभाव, मैदाने, सांस्कृतिक चळवळ, वारकरी संप्रदायाला भेडसावणाऱ्या ज्वलंत समस्या, बेपत्ता शासकीय योजना, शैक्षणिक सुविधांचा बोजवारा, दळणवळणाच्या साधनांचा अभाव, प्रवासी वाहतूक सेवेबाबत निष्क्रियता, गंभीर बनलेल्या पिण्याच्या पाण्याचे वास्तव, महिला सुरक्षितता धोरण, वाहन पार्किंग समस्या, ग्रामीण भागातील विहिरी, तलावांची स्वच्छताची जबाबदारी, शहरी भागातील तलावांचे सुशोभिकरण, रेल्वे विषयक स्वतंत्र समस्या,
अस्वच्छतेचा डोंगर, ग्रंथालय, वाचनालयांची वानवा याशिवाय राजकीय दहशत, पोलिस यंत्रणा, महापालिका, तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालयातून होणारी गळचेपी, शासकीय दाखले मिळण्यास होणारा विलंब, नर्सरी ते उच्च शिक्षणाच्या प्रवेशाविषयी तक्रारीवर आधारित लेख, वाढती अतिक्रमणे, वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील अपघात, सार्वजनिक बांधकाम खाते, वनखात्याची मुजोरी, महावितरणचा फटका, सिडकोची दादागिरी, नैनाची मुजोरी, महापालिकेचा मालमत्ता कर, शहरे व ग्रामीण भागात रेंगाळलेले सार्वजनिक प्रकल्प, उच्च शिक्षितांसाठी मार्गदर्शन केंद्र, ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता, व्यापारी केंद्राचा अभाव आदी व याव्यतिरिक्त पनवेलच्या समस्यांवर आधारित लेख आणि छायाचित्रांचा समावेश स्पर्धेत असावा अशी प्रेमळ अट ठेवण्यात आली आहे. स्वच्छ अक्षरात लिहून किंवा टाईप केलेल्या लेखांचा विचार केला जाईल. लेख व छायाचित्रे १ जून २०२३ पर्यंत मिळतील अशा उद्देशाने खालील पत्त्यावर पोस्ट करावे, अक्षर मर्यादा किमान ७०० ते हजार असावी.
Tags
पनवेल