पनवेल दि. ०५ ( वार्ताहर ) : पनवेल परिसरामध्ये स्वस्तामध्ये घर देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. चेंबूरमधील महिलेलाही घोट गावातील चाळीमध्ये घर देण्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.
चेंबूरमध्ये राहणाऱ्या मीना गवारे यांनी ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून मानसरोवर येथे कार्यालय असलेल्या उन्नीथन नावाच्या व्यक्तीशी घर खरेदी करण्यासाठी व्यवहार केला होता. पनवेल जवळील घोट येथे चाळीमध्ये साडेसात लाख रुपयांना ३७५ चौरस फुटाचे घर देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. यासाठी जानेवारी २०१७ मध्ये रोख २ लाख रुपये देण्यात आले होते.
नोव्हेंबर २०१७ मध्ये चेकने तीन लाख रुपये दिले होते. घर खरेदीसाठी पाच लाख रुपये दिल्यानंतरही प्रत्यक्षात घर मिळाले नाही. पाठपुरावा केल्यानंतर फक्त आश्वासने देण्यात आली. घर मिळाले नाही व पैसेही परत दिले जात नसल्यामुळे संबंधितांविरोधात कामोठे पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
Tags
पनवेल