शेतकऱ्यांच्या दावणीला बांधलेल्या गायींची चोरी करणाऱ्या टोळीला पनवेल तालुका पोलिसांनी केली अटक








शेतकऱ्यांच्या दावणीला बांधलेल्या गायींची चोरी करणाऱ्या टोळीला पनवेल तालुका पोलिसांनी केली अटक 
पनवेल दि.२२ (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील विविध भागातून शेतकऱ्यांच्या दावणीला बांधलेल्या गायींची चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आलं आहे. पनवेल तालुका पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने मुंबई, ठाणे सह रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून एका सराईत गुन्हेगारासह सहा जणांना अटक केली आहे. या आरोपींनी तालुक्यातील विविध भागातून चोरी केलेले ५ गायीची कत्तल केल्याची कबुली पोलिसांना दिली.  



               नेरेपाडा येथील रोहिदास भगत तसेच वामन खुटले यांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गाय चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना गाईंची चोरी करणारी टोळी तालुक्यात सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, हेड कॉन्स्टेबल महेश धुमाळ, हेड कॉन्स्टेबल सुनील कुदळे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश भगत आदींचे पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या साहाय्याने माहिती काढली असता सदर गुन्हे हे सराईत आरोपी नुर मोहम्मद उर्फ पापा ईसा कच्छी (वय २४, रा.कच्छी मोहल्ला, पनवेल) याने केल्याची माहिती मिळाली.



 पनवेल तालुका पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर गुन्हा तसेच कसळखंड येथील गाय चोरीचा गुन्हा असे दोन गुन्हे हे त्यानेच आपल्या साथीदारांच्या साहाय्याने केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेल्या ५ गायींची कत्तल केल्याची देखील कबुली दिली. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी मुंबई, ठाणे सह रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून त्याचे साथीदार आरोपी असिफ अब्दुल रशिद कुरेशी (वय २७, रा.कुर्ला), अनस मुख्तार कुरेशी (वय २६, रा. बांद्रा), जुबेर उर्फ जिशान रियाजुलहसन कुरेशी (वय २८, रा. बांद्रा), जियाहुल उर्फ जाहुल रियाजुलहसन कुरेशी (वय २६, रा. बांद्रा), तसेच जाफर अन्वर शेख यांना अटक केली आहे.




 यापैकी नुर मोहम्मद उर्फ पापा ईसा कच्छी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पनवेल तालुक्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या घटनेचा अधिक तपास पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.


थोडे नवीन जरा जुने