छत्री आणि रेनकोटची खरेदी करण्यासाठी नागरिकांची पावले बाजारपेठांकडे
छत्री आणि रेनकोटची खरेदी करण्यासाठी नागरिकांची पावले बाजारपेठांकडे
पनवेल दि.१५ (वार्ताहर) : पावसाने अद्याप दमदार सुरुवात केली नसली तरी छत्री आणि रेनकोटची खरेदी करण्यासाठी नागरिकांची पावले पनवेलमधील बाजारपेठांकडे वळू लागली आहेत. चिनी छत्र्यांवर घातलेली बंदी, भारतीय बनावटीच्या छत्र्यांच्या मागणीत होत असलेली वाढ आणि बाजारातील उपलब्ध छत्री, रेनकोट आदी विविध कारणांमुळे किमतींवर परिणाम झाला आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा छत्री, रेनकोटच्या किमतीत १० १२ टक्क्यांनी वाढ झाली असून ग्राहकांना छत्री, रेनकोटसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.             गतवर्षी नियमितपणे शाळा, महाविद्यालये, कार्यालये सुरू झाली. यामुळे गतवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी छत्री, रेनकोटचा मोठ्या प्रमाणावर खप झाला होता. यंदाही छत्री आणि रेनकोटला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. याआधी बाजारात चीनी छत्री, रेनकोटला मागणी होती. मात्र करोनानंतर या वस्तूंच्या मागणीत घट झाली आहे. नागरिक भारतीय बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी, देशी बनावटीच्या वस्तूंच्या मागणीत वाढ होत आहे. सध्या बाजारात छत्रींची (दर्जानुसार) किंमत १५० ते एक हजार रुपयापर्यंत, तर रेनकोट (दर्जानुसार) २०० ते एक हजार ५०० रूपयांपर्यंत आहे. गतवर्षी छत्र्यांची किंमत १०० ते ६०० रुपयांदरम्यान इतकी होती. तसेच लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या रंगीबेरंगी छत्र्याही बाजारात उपलब्ध आहेत. या छत्र्यांच्या किमती ३०० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत आहे. प्रसिद्ध कंपनीच्या छत्रीची किंमत ५५० रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत आहेत. लहान मुलांचे रेनकोट ४०० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.थोडे नवीन जरा जुने