पनवेल दि.१४(संजय कदम): महिलेचा मृतदेह ओढणीने गळा आवळून बेडशिटमध्ये गुंडाळुन, तसेच प्लास्टीकच्या गोणीमध्ये भरून सेलोटेप लावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने रेतीबंदर मुंब्रा येथील विसर्जन घाट येथ फेकुन दिला होता. त्याबाबत मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर मृतदेह हा अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील महिलेचा होता. मृतदेह कुजलेल्या व अळया पडलेल्या स्थितीत तसेच मयताचे अंगावरील कपडे व्यतिरीक्त काहीएक माहिती नसल्याने मृताची ओळख पटवुन गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान मुंब्रा पोलीसांसमोर होते. मात्र हा गुन्हा उघडकीस आणण्यात मुंब्रा पोलिसांना यश आले असून गुन्यातील मुख्य आरोपीस पश्चिम बंगाल येथू तर त्याच्या साथीदारास मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.
हा गंभीर गुन्हा उघडकीस आणणेकरीता वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपआयुक्त परि-१ ठाणे गणेश गावडे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी. कोल्हटकर, पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांचे मार्गदर्शनात सपोनि संतोष उगलमुगले, मसपोनि कृपाली बोरसे व पोउपनि नितीन भोसले व २० पोलीस अंमलदार यांची तीन विशेष पथके नेमुन आरोपीचा शोध घेवून अटक करणेबाबत मार्गदर्शन केले. मृतदेहाच्या स्थितीवरून तीचा मृत्यु अंदाजे ३ ते ४ दिवसापुर्वी झालेला असावा त्या अनुषंगाने दुसऱ्या पथकातील सपोनि उगलमुगले व अंमलदार यांनी घटनास्थळाची पाहणी करून, त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. यामध्ये त्यांना
घटनास्थळावर एका तीन चाकी टेम्पोच्या संशयास्पद हालचाली दिसुन आल्या परंतु सदर टेम्पोचा क्रमांक अस्पष्ट दिसत असल्याने संशयीत टेम्पो ज्या दिशेने गेला त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले नंतर संशयीत टेम्पो (MH02-FL-2903) मिळुन आला. त्यावरुन टेम्पोची ओळख पटली. सदरचा टेम्पो नबाब नुरु शेख (रा. रूम नंबर सी / १२, गुलमोहर को. ऑप हौ. वर्सोवा, अंधेरी) याच्या नावावर असल्याची माहिती प्राप्त केली. मिळालेल्या पत्त्यावर जावुन पोलिसांनी तेथे राहणारे भाडेकरूला मयत महिलेचा फोटो दाखविला असता त्यांनी ही नबाब नुरु शेख याची पत्नी असल्याचे सांगीतले.
मात्र नवाब शेख हा त्याचे मुळ गांव मुर्शीदाबाद, पश्चिम बंगाल येथे पळुन गेल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ सपोनि उगलमुगले व पथक हे संशयीताचा शोध घेणेकरीता पश्चिम बंगाल येथे रवाना झाले. पोनि निकम, मसपोनि बोरसे, पोउपनि भोसले व अंमलदार यांनी वर्सोवा, अंधेरी मुंबई येथे जावुन घटनास्थळाचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्याचे निरीक्षण केले असता नवाब शेख यांच्यासह एक इसमाच्या संशयास्पद हालचाली आढळुन आल्याने, त्याचा शोध घेवुन त्यास वर्सोवा अंधेरी मुंबई येथून ताब्यात घेतले. सलमान उर्फ रज्जन कुल्लु खान (वय-२० वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. जुहु गल्ली, अंधेरी पश्चिम) असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे
. गुन्हयाचे अनुषंगाने त्याचेकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामध्ये मयत महिलेचे नांव मुन्नी असुन ती नबाब शेख याची पत्नी असल्याचे सांगुन तिचा नवाब याने गळा आवळला व सलमान याने पाय दाबुन धरून खुन केल्याचे सांगीतल्याने त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपीत नवाब यास ताब्यात घेण्याकरीता पश्चिम बंगाल येथील पोलीस पथक हे त्याचा शोध घेत होते. नवाब याने अतिशय नियोजनबद्ध रितीने खून करून पकडले जावु नये म्हणुन त्याचेकडील मोबाईल बंद करून तो वेगवेगळया ठिकाणी लपुन राहत होता. मुर्शीदाबाद व बर्धमान या दोन जिल्हयात सतत ०८ दिवस अविरतपणे कौशल्यपुर्ण तपास करून तांत्रीक तपास व गोपनिय बातमीदारांचे आधारे आरोपीत नबाब शेख यांस बेलदंगा जिल्हा मुर्शीदाबाद राज्य - पश्चिम बंगाल येथुन शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडे केलेल्या तपासामध्ये त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने मा.न्यायालय, बहीरामपुर, मुर्शीदाबाद, पश्चिम बंगाल येथुन ट्रान्झीट रिमांड घेवुन मुंब्रा पोलीस ठाणे येथे आणुन अटक करण्यात आली असुन दोन्ही आरोपींना १७ जून २०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर आहे.
मुख्य आरोपी नवाब याचेकडे सखोल तपासाअंती मयत महिला ही त्याची पत्नी असुन तीचे नांव उम्मेजान बीबी उर्फ मुन्नी नवाब शेख, वय-२६ वर्षे, असे असुन सन २०१२ मध्ये तीचेशी विवाह केला होता. परंतु ती मुंबईमध्ये त्याचेसोबत सतत राहत नसल्याने तो तीच्या चारीत्र्याचा संशय घेत असल्याने त्यांचेमध्ये वाद होत होते. चारीत्र्या च्या संशयावरून त्याने तीचा साथीदार सलमान याचे मदतीने तीचा गळा आवळुन, खून करून तीचे प्रेत बेडशिटमध्ये गुंडाळुन, प्लास्टीकच्या गोणीमध्ये भरून सेलोटेप चिटकवुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे टेम्पोमधुन वर्सोवा अंधेरी मुंबई येथुन मुंब्रा, रेतीबंदर येथील विसर्जन घाट येथे फेकुन दिले. नमुद गंभीर गुन्हा उघडकीस आणण्याची उल्लेखनीय कामगिरी पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर अपर पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ–१ गणेश गावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कळवा विभाग विलास शिंदे यांचे
मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निवृत्ती कोल्हटकर, पोलीस निरीक्षक संजय पवार, पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम, सपोनि संतोष उगलमुगले, सपोनि कृपाली बोरसे, सपोनि अजय कुंभार, पो.उप निरी. नितीन भोसले, पो.उप निरी. प्रसाद चव्हाण, पो.उप निरी. मेहबुब मकानदार, सपोउपनिरी दिपक जाधव व अंमलदार सतिश खाबडे, अजिज तडवी, तुषार महाले, संतोष पवार, तेजस परब, अर्जुन जुवाटकर, बाबुराव खरात, संतोष गायकवाड, निळकंठ लोंढे, मयुर लोखंडे, कृष्णा आव्हाड, प्रमोद जमदाडे, नवनाथ चव्हाण, भुषण खैरणार, सोपान काकड, आण्णासो एडके व समाधान माळी यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाबासाहेब निकम हे करीत आहेत.
Tags
पनवेल