पनवेल (प्रतिनिधी) दानशूर व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, क्रीडा कार्यक्रमांच्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक ०२ जून रोजी न्हावेखाडी रामबाग येथे 'जल्लोष सुवर्णयुगाचा' मनोरंजन कार्यक्रम तसेच सत्यनारायण महापूजेचे तर रविवार दिनांक ०४ जून रोजी मोहोपाडा येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
ग्रामस्थ मंडळ न्हावेखाडी व श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसाद तर सायंकाळी ७. ३० वाजता स्टेप आर्ट डान्स अकॅडमी प्रस्तुत पप्पू सूर्यराव निर्मित आणि गायक योगेश आग्रावकर, गायक अमोल जाधव, हास्य कलाकार सुशांत पाटील अशा अनेक कलाकारांचा समावेश असलेला 'जल्लोष सुवर्णयुगाचा' हा नृत्य आणि हास्य मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उरण विधानसभा भाजपच्या वतीने मोहोपाडा येथील जनता विद्यालयात रविवारी सकाळी ९ ते दुपारी ०१ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सामान्य तपासणी, शल्य चिकित्सा, अस्थिरोग, कान, नाक, घसा, नेत्ररोग, दंत चिकित्सा, त्वचारोग, रक्त तपासणी, ईसीजी, विविध आरोग्य तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषधोपचार, तसेच शस्त्रक्रिया सुविधाही उपलब्ध असणार आहे.
त्याचबरोबर यावेळी रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आले असून या शिबिराचे उदघाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
Tags
पनवेल