स्वराज्य कंपनीविरोधात विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेत्यांची मोट बांधणार
पनवेल:
स्वराज्य स्टोन्स एल एल पी कंपनी व्यवस्थापनामुळे दगड आणि खडीचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना नाहक फटका बसत आहे. पूर्वीच्या बांधकाम मालाच्या दरात दुपटीने भाववाढ झाली आहे. दरवाढीनंतर नवीन घर घेणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना मात्र मोठा फटका बसला आहे.
याविरोधात मुंबई, नवी मुंबई तसेच रायगडमधील बडे बांधकाम व्यावसायिक व मोठे शासकिय ठेकेदार आक्रमक झाले
असून स्वराज्य एलएलपी कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात विरोधी पक्षातील प्रमुख नेते व सत्ताधारी पक्षातील देखील काही प्रमुख नेत्यांची एक मोट बांधण्याचे काम सुरु आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक संघटनांच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवरील नेते तसेच सध्याच्या सरकारमधील काही उच्चपदस्थांच्या भेटीगाठी सुरु आहेत. तसेच लवकरच एका राष्ट्रिय पातळीवरील वरीष्ठ नेत्यांसमवेत बैठक घेणार असल्याची खात्रीशीर माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे.
स्वराज्य एल एल पी कंपनीतील चार संचालकांपैकी एका संचालकाने राजीनामा दिला आहे. मात्र राजीनामा दिल्याचे भासवून पडद्यामागून स्वराज्य स्टोन्स एल एल पी कंपनीचे सर्व कामकाज राजरोसपणे सुरु असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नव्हे तर पनवेल, उरण व नवी मुंबई पुरते मर्यादित असलेले क्षेत्र आता खोपोली व पेण भागात पसरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे व्यवसायिकांसह सर्वसामान्य ग्राहकांना मोठा भुर्दंड बसत असल्याचा आरोप केला जात आहे.
त्यामुळे जोपर्यंत खडी क्रश सँडचे वाढलेले दर मुंबई, नवी मुंबई व रायगडमधील सर्व बिल्डर असोसिएशन वरीष्ठ पातळीवर लढा देणार असल्याचे समजते. तसेच या लढ्यात परिसरातील सर्व मोठ्या बिल्डर असोसिएशन जोडले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Tags
पनवेल