खारघर पोलिसांनी तब्बल १ कोटी २९ लाखाचे अंमली पदार्थ केले जप्त; ४ नायजेरीयन ताब्यात







खारघर पोलिसांनी तब्बल १ कोटी २९ लाखाचे अंमली पदार्थ केले जप्त; ४ नायजेरीयन ताब्यात
पनवेल दि.२७ (वार्ताहर) : खारघर पोलिसांनी खारघर, सेक्टर- १२ मधील दोन घरावर छापे मारुन अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने जमलेल्या २ पुरुष आणि २ महिला अशा ४ नायजेरीयन नागरिकांची धरपकड़ करुन त्यांच्याकडून तब्बल १ कोटी २९ लाख ५० रुपये किंमतीचे अंमली पदार्थ मेथाक्युलॉन जप्त केले आहे. या कारवाईदरम्यान सदर नायजेरीयन नागरिकांनी पोलिसांसोबत धक्का-बुक्की करुन आरेरावी करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी चौघांना जेरबंद केले. या कारवाईत पकडण्यात आलेल्या नायजेरीयन नागरिकांजवळ पासपोर्ट आणि व्हीजा नसल्याचे आढळून आले असून खारघर पोलिसांकडून या चौकडीची कसून चौकशी करण्यात येत आहे.



               खारघर सेक्टर १२ मध्ये एसबीआय बँकेच्या पाठीमागील रुम नं. १०१ आणि २०१ मध्ये काही नायजेरीयन नागरिक अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ, महिला पोलीस निरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक धुळगंडे आणि त्यांच्या पथकाने सेक्टर- १२ मधील दोन्ही घरावर छापे मारले. त्यानंतर पोलिसांनी २ नायजेरीयन पुरुष आणि २ महिलांची धरपकड केली. यावेळी नायजेरीयन पुरुषांनी पोलिसांसोबत धक्काबुक्की केली. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेजवळ आणि पोलीस हवालदार गोसावी यांच्या हातास किरकोळ दुखापत झाली. मात्र, त्यानंतर देखील पोलिसांनी बळाचा वापर करुन चौघांना ताब्यात घेतले. 



त्यानंतर पोलिसांनी चौघांची झडती घेतली असता, इक्बुलेम बेनजामीन संडेय (४२) या नायजेरीन नागरिकाजवळ ५२३ ग्रॅम वजनाचे पांढऱ्या रंगाचे खडे पावडर असलेला ५२ लाख ३० हजार रुपये किंमतीचे मेथ्याक्युलॉन सापडले. तसेच सिबाना जोनाथन बेनिन (३५) याच्याजवळ ५२२ ग्रॅम वजनाचे ५२ लाख २० हजार रुपये किंमतीचे मेथ्याक्युलॉन सापडले. तसेच नायजेरियन महिला इखानोबा इम्माकिवेल्ला क्टोल्ड (२२) हिच्या जवळ १२ लाख रुपये किंमतीचे १२० ग्रॅम मेथ्याक्युलॉन तर फव्होर जेरोर्ज (२३) हिच्या जवळ १३ लाख रुपये किंमतीचे १३० ग्रॅम वजनाचे मेथ्याक्युलॉन सापडले. त्यामुळे पोलिसांनी सदरचे अंमली पदार्थ जप्त करुन त्यांच्याकडे पासपोर्ट आणि व्हिजा बाबत चौकशी केली असता, त्यांच्याकडे भारतातील वास्तव्याबाबतची कोणतीही वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यानंतर खारघर पोलिसांनी सदर चारही नायजेरीयन नागरिकांविरोधात एनडीपीएस कलमानुसार गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे


थोडे नवीन जरा जुने