पनवेल, दि.११ (संजय कदम) : खांदा कॉलनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सिडको आणि महानगरपालिकेच्या भिजत घोंगड्यात वाहनचालक आणि रहिवाशांना मात्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या विरोधात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला असून पक्षाचे पनवेल शहर कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी थेट खड्ड्यांचे पूजन करीत लक्षवेधी आंदोलन केले. त्यांनी रहिवाशांच्या प्रतिनिधिक भावना महापालिका प्रशासनापर्यंत पोहोचवल्या.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची स्थिती चांगली नाही. सिडको कडून महापालिकेने रस्ते हस्तांतरित करून घेतले. मालमत्ता कर वसूल करण्यासाठी मनपा ने घाई घाई मध्ये प्राधिकरणाकडून रस्ते हस्तांतरित करून घेतले. ते सुस्थितीत नसल्याने अगोदरच ठिकठिकाणी खड्डे पडले होते. त्यात मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. खांदा कॉलनीतील रस्ते खड्ड्यात की खड्डे रस्त्यात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महानगर गॅस च्या वाहिन्या टाकण्यासाठी रोडचे वाटोळे करण्यात आले. त्यानंतर पूर्वस्थितीत रस्ते सिडको ने आणले नाहीत.
मनपाने सुद्धा नागरिकांची फसवणूक करत खांदा कॉलनीतील रस्त्यांची डागडूजी केली नाही. त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यातून वाट काढावी लागत आहे. चार चाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कैची शॉकप्सर, सस्पेन्सर ची कामे निघत आहेत. वाहन चालकांना मोठा भुर्दंड बसत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही योग्य ती कार्यवाही होत नसल्याचे पाहून शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल शहर कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला. त्यांनी खांदा कॉलनी सिग्नल जवळ खड्ड्यांचे पूजन करून तीव्र संताप व्यक्त केला. सिडको ने पाया रचला आणि महानगरपालिकेने त्यावर खड्ड्यांचा कळस केला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या निमित्ताने उमटल्या. यावेळी माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख सदानंद शिर्के उपस्थित होते.
Tags
पनवेल