पनवेल दि.१३ (वार्ताहर) : पनवेल आरटीओ कार्यालयाचा ताबा जवळपास दलालांनी घेतला आहे. या ठिकाणी पारदर्शकता लागेबांधेच्या आड दडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना या ठिकाणी थाराच मिळत नाही. एजंट शिवाय काम होत नसल्याने वाहन परवानासह इतर कागदपत्रांसाठी मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागत आहेत. प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून डोळेझाक केली जात आहे.
परिणामी नागरिकांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. तरी या संदर्भात त्वरित कार्यवाही करण्यात यावी अन्यथा मुख्यमंत्री महोदयांकडे आम्हाला दाद मागावी लागेल असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
पनवेल या ठिकाणी प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आहे. लोह पोलाद बाजार समितीच्या फॅसिलिटी सेंटर मध्ये सध्या आरटीओ चा कारभार सुरू आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारीत पनवेल कर्जत खालापूर या परिसराचा समावेश आहे. येथून वाहन परवाना सह इतर कामांसाठी नागरिक कार्यालयामध्ये येतात. ड्रायव्हिंग लायसन्सकरीता परिवहन विभागाने ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. त्यानुसार वाहन चालक अर्ज सुद्धा करतात. मात्र त्यांना कागदपत्रांसह इतर गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आरटीओमध्ये यावे लागते. परंतु येथे सर्वसामान्यांना दाद दिली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे एजंट अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लागेबांधे असल्याने लायसन व इतर कामासाठी आलेल्या नागरिकांची कामे होत नाहीत. त्यांना कोणतेही मार्गदर्शन किंवा माहिती दिली जात नाही. ते दिवसभर रांगेत उभे राहतात एजंट मात्र आपले काम करून निघून जातात. त्यांनाच प्राधान्य दिले जात असल्याची वस्तुस्थिती आहे
. त्यामुळे सर्वसामान्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. आपले काम होत नसल्याने नाईलाजास्तव त्यांना एजंटकडे जावे लागते. दुचाकी व चार चाकी वाहन परवान्यासाठी फक्त दीड हजार रुपये खर्च येतो. तिथे दलाल चार ते पाच हजार रुपये उकळत आहेत. केंद्र व राज्य सरकार हे नागरिकांना सोपस्कार व्हावे यासाठी प्राधान्य देत असताना स्थानिक कार्यालयांमध्ये जाणून-बुजून गुंतागुंत केली जाते. परिणामी पारदर्शकतेचा फज्जा उडाला आहे. वाहन परवाने काढण्यासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना खिडकीसमोर रांगा लावाव्या लागतात. ऑनलाइन चाचणीसाठी ताटकळत बसावं लागतं, परंतु एजंट कुठेही रांगेत दिसत नाहीत. आपल्या कागदांचा गठ्ठा थेट त्या त्या टेबलांवर पोचवला जातो. परिणामी त्यांची विना विलंब कामे होत आहेत. त्या बदल्यात वाहनचालकांकडून पैसे वसूल केले जातात. परवाना आणि इतर कामासाठी आलेल्या नागरिकांना त्यांचे काम जलद गतीने होईल अशी यंत्रणा निर्माण करावी. या व्यतिरिक्त आरटीओ कार्यालयामध्ये सूचना फलक लावून परवाने आणि इतर कामांसाठी नेमके कोणत्या कोणत्या ठिकाणी जायचे याची ठळकपणे माहिती द्यावी. कशीसाठी एक स्वतंत्र काउंटर सुरू करावा. जेणेकरून संबंधितांच्या मार्फत वाहन परवाना काढण्यासाठी नेमके कोणत्या कोणत्या टेबलावर जायचे आहे याची माहिती देण्यात यावी. अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी केली आहे. लोकसेवा हे लोकसेवकांचे ब्रीदवाक्य असून याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी अन्यथा मुख्यमंत्री महोदयांकडे आम्हाला दाद मागावी लागेल असा इशारा शेवाळे यांनी दिला आहे.
Tags
पनवेल