जनता सुज्ञ त्यामुळे विरोधकांनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये- माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांचा विरोधकांना सल्ला



पनवेल(प्रतिनिधी) महापालिका क्षेत्रातील कळंबोली शहराच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी व त्या संदर्भातील पाठपुरावा कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केला होता. त्या अनुषंगाने कळंबोलीतील विकासकामांसाठी सदरच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याचे सर्व श्रेय भाजपच्या लोकप्रतिनिधींचे असून जनता सुज्ञ आहे त्यामुळे विरोधकांनी याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, असा सल्ला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. २६ सप्टेंबर) कळंबोली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांना दिला.
         या पत्रकार परिषदेस महानगरपालिकेचे भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक अनिल भगत, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील, भाजपचे कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, राजेंद्र शर्मा, कमल कोठारी, संजय दोडके, संदीप म्हात्रे, सुनिल ढेंबरे, रामा महानवर, बबलू शेख यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



           २०१६ साली स्थापन झालेल्या महापालिकेने अल्पावधीतच विकासकामांच्या दृष्टिकोनातून भरारी घेतली असून याकामी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख आणि सहकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका उपयुक्त ठरली असल्याचे परेश ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले कि, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, क्रीडा अशा विविध सुविधा महत्वाच्या मानून आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख व आम्ही लोकप्रतिनिधी काम करत आहोत. सत्ताधारी म्हणून विकासकामे आणि त्यासाठी आर्थिक तजवीज करण्यासाठी नियोजन करण्याचे काम केले आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले कि, रुग्णांच्या सेवेसाठी यूपीएचसी सेंटर चांगल्या प्रकारे कार्यान्वित असून आणखी सुविधा म्हणून मोबाईल हॉस्पिटल सुरु करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. २०१६ ला महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर मालमत्ता कर लागू झाला. मालमत्ता कराला पर्याय नाही मात्र मालमत्ता करा संदर्भात विरोधी पक्षाने राजकारण केले आणि नागरिकांची दिशाभूल केली. आम्ही नागरिकांच्या विकासासाठी काम करत आहोत.



 मध्यंतरी कोरोनाचा काळ सर्वांवर आघात करणारा ठरला. त्यामुळे कोरोना काळातील मालमत्ता कर संदर्भात सूट मिळावी अशी आमची आग्रही मागणी आहे आणि त्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर प्रयत्नशील असल्याचेही परेश ठाकूर यांनी अधोरेखित केले. जीएसटी अनुदान संदर्भात बोलताना त्यांनी पूर्वीच्या आयुक्तांकडून मोठ्या चुका झाल्याचे सांगितले. त्यामुळे महापालिकेला योग्य जीएसटी अनुदान मिळत नव्हता. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष घातले. त्यांनी व माजी नगरसेवक अनिल भगत यांनी पाठपुरावा केला. जीएसटी बद्दल अनेक सल्लागारांशी चर्चा केली, कोर्टात दाद मागितली सरकारच्या विरोधात लढलो. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने तर दुर्लक्ष केले. मात्र शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर जीएसटीची जबाबदारी घेतली आणि या वर्षांपासून जीएसटीचा योग्य अनुदान मिळायला सुरुवात झाली आणि हे अनुदान दरवर्षी ४०० ते ४५० कोटी रुपये असणार असून गेल्या सहा वर्षाचे १६५० कोटी रुपये जीएसटी अनुदान महानगरपालिकेला मिळणार आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात विविध सुविधांना बळ मिळणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.


 कळंबोली मधील होल्डिंग पॉण्डमध्ये मँग्रोजची वाढ होत राहिली त्यामुळे नाल्यांचे पाणी निचरा होण्यास अडचण निर्माण झाली त्या अनुषंगाने डासांची उतप्ती वाढली आणि आरोग्यच्याबाबत प्रश्न निर्माण झाले. आमचे लोकप्रतिनिधी जागरूक असल्याने त्यांनी या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला आता धारण तलाव साठी निधी उपलब्ध झाल्याने सदरचा प्रश्न सुटणार आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यापुढेही नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू, असेही परेश ठाकूर यांनी आश्वासित केले. 
          यावेळी माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांनी म्हंटले कि, पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली शहराचे झपाटयाने नागरीकरण होत आहे. मागील ३५-४० वर्षापूर्वी सिडकोने या शहराची निर्मिती केली. पण या शहराचे झपाट्याने नागरीकरण होत असून मोठ्या प्रमाणात लोकसंख्येत वाढ होत असल्याने येथील रस्ते, ड्रेनेज लाईन, मैदाने, पाणीपुरवठा योजना, होल्डिंग पॉन्ड, नाले यासारख्या मुलभूत सुविधा अपुऱ्या पडत असून या ठिकाणी मूलभूत सुविधांपासून नागरिकांना वंचित रहावे लागत आहे.


 आता या शहरातील सुविधा महापालिकेला हस्तांतरीत झाल्याने पनवेल महानगरपालिकेमार्फत रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करणे, नव्याने ड्रेनेज लाईन टाकणे, होल्डिंग पॉन्ड मधील गाळ काढणे, मैदाने विकसित करणे, नविन पाण्याची टाकी उभारणे अशा कामांसाठी निधीची तरतूद करण्याची गरज होती. त्यामुळे या संदर्भात आम्ही कळंबोलीतील भाजपच्या लोकप्रतिनिधींनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे विनंती मागणी केली होती. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीने महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदनाद्वारे कळंबोलीच्या विकासासाठी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करून पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने त्यांनी रस्त्यासाठी १०० कोटी रुपये आणि धारण तलावासाठी ११६ कोटी ६० लाख रुपयांची अशी एकूण २१६ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद केली असून त्याबद्दल दूरदृष्टी असलेले आमदार प्रशांत ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांचे आभार मानतो. असे सांगतानाच मागणीला मंजुरी मिळाल्यानंतर विरोधकांना पोटशूळ आले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.  

कोट- कळंबोलीतील विकासकामांसंर्भात माजी सभागृहनेते परेश ठाकूर सकाळी सात वाजता अधिकाऱ्यांसोबत पाहणी आणि त्या अनुषंगाने आढावा घेत होते. त्यांच्या तत्परतेने अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. - अमर पाटील, माजी स्थायी समिती सभापती  




थोडे नवीन जरा जुने