गुन्ह्याला माफी नाही






गुन्ह्याला माफी नाही
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या राज रिसॉर्ट मध्ये चोरी करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या
पनवेेल, दि.7 (वार्ताहर) ः तालुक्यातील उसर्ली, रिटघर येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या राज रिसॉर्ट येथे हॉटेलच्या गल्ल्यामधून चोरी करणाऱ्याच्या अवघ्या काही तासात मुस्क्या आवळण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले आहे. ग्राहकांच्या नोंदणीची व्यवस्था पाहणारे राजेश कुंदनलाल शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई केल्यामुळे चोराला पकडण्यात यश आले आहे. सदर चोरीच्या गुन्ह्यात यश गावडे यास तालुका पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.





याबाबत सविस्तर हकीकत अशी की, माजी नगरसेवक संतोष उरणकर यांच्या मालकीचे राज रिसॉर्ट हे अत्यंत विलोभनीय आणि प्रेक्षणीय रिसॉर्ट आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील प्रसिद्ध आहे. राज रिसॉर्ट मध्ये ग्राहकांची नोंदणी करणे तसेच त्यांनी अदा केलेल्या शुल्काचा हिशोब ठेवणे ही जबाबदारी व्यवस्थापक राजेश कुंदनलाल शर्मा हे पाहत असतात. एक ऑक्टोबर रोजी रिसॉर्ट मालक संतोष यांनी व्यवस्थापक शर्मा यांच्याकडे एक लाख रुपये रोखीने दिले होते. शर्मा यांनी त्यांच्या ऑफिस डेस्क मधील ड्रॉवरमध्ये ते पैसे ठेवले. याच ड्रॉवरमध्ये अगोदरच्या हिशोबातले 26 हजार 500 रुपये होते. एकूण 1 लाख 26 हजार 500 रुपये मोजून राजेश कुंदनलाल शर्मा ड्रावर लॉक् केला. रात्री साडेदहाच्या सुमारास नोकरीवरून घरी जात असताना राजेश शर्मा यांना त्यांच्याजवळची चावी खिशात नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने फोन करून ग्राहक नोंदणी आणि हिशोब या कामात मदत करणाऱ्या त्यांचा असिस्टंट यश गावडे यास फोन करून चावी शोधण्यास सांगितले. परंतु तिकडे चावी सापडली नाही.






 दुसऱ्या दिवशी चावीचा शोध घेऊन देखील चावी न मिळाल्याने राजेश यांनी मालक संतोष यांना फोन करून चावी हरवली असल्याचे कळविले. त्या रात्री राजेशा यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी दोन दिवस सिक लिव्ह घेतली. 5 ऑक्टोबर रोजी कामावर रुजू झाल्यावर ती त्यांनी मालक संतोष उरणकर यांच्याकडून त्यांच्या जवळील चावी मागविली. त्यानंतर ड्रॉवर उघडला असता आतली एक लाख 26 हजार पाचशे रुपयांची रक्कम चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या ठिकाणी यश गावडे याचाच वावर असल्यामुळे त्याच्यावरती संशय व्यक्त करत सहा ऑक्टोबर रोजी राजेश कुंदनलाल शर्मा यांनी पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच वपोनि अनिल पाटील व पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार, पो.उपनिरिक्षक हर्षद राजपूत, पो.हवा.सतीश तांडेल, वैभव पाटील व पथक शोध घेत असताना पोलीस हवालदार सतीश तांडेल याला खास खबर्‍याकडून माहिती मिळाली की सदर इसम हा फार्म हाऊस परिसरातच लपला आहे. त्यानुसार या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार करीत आहेत.चौकट





निसर्ग संपन्न वातावरणाच्या कुशीत, शुद्ध हवेच्या सानिध्यात असणारे राज रिसॉर्ट हे अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे. अत्यंत आदरपूर्वक पाहुणचार आणि ग्राहकांना मिळणारी अप्रतिम सर्विस यामुळे राज रिसॉर्ट उच्च प्रतीच्या दर्जाचे रिसॉर्ट म्हणून ओळखले जाते.त्यामुळे याठिकाणी कुठल्याही प्रकारची नियमबाह्य वागणूक खपवून घेतली जाणार नाही हाच संदेश या निमित्ताने दिला गेला आहे


थोडे नवीन जरा जुने