पनवेल दि. २९ (वार्ताहर ) :तालुका विधी सेवा समिती पनवेल , तहसील कार्यालय, पनवेल आणि चांगू काना ठाकूर महाविद्यालय, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात चांगू काना ठाकूर विद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.
पनवेलचे कार्यतत्पर तहसीलदार विजय पाटील यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. महाविद्यालयाचे प्राचार्यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले.
मुख्य मार्गदर्शक म्हणून तालुका विधी सेवा समिती पनवेलचे पॅनल ॲडवोकेट इंद्रजित भोसले उपस्थित विद्यार्थ्यांना संविधान निर्मिती , मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, वेगवेगळ्या देशांच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेत समाविष्ट झालेली तत्त्व, नागरिकांचे मूलभूत कर्तव्य अशा विविध मुद्द्यांना स्पर्श करून विषयाची मांडणी केली.अध्यक्षीय मनोगतात तहसीलदार विजय पाटील यांनी मूलभूत हक्क यांबरोबरच मूलभूत कर्तव्य सुद्धा तितकीच महत्त्वाची असून त्याचे महत्व अगाध आहे.
सुजाण नागरिक म्हणून राष्ट्र पुढे नेणाऱ्या मूल्यांची आपण जोपासना केली पाहिजे. या आशयाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाची प्रस्तावना पनवेल न्यायालयातील पी. एल. व्ही. शैलेश कोंडसकर यांनी केली. कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन नायब तहसीलदार संभाजी शेलार यांनी केले.
या कार्यक्रमास मंचावर नायब तहसीलदार लचके, ॲडवोकेट सुयश कामेरकर आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विधी सेवा प्राधिकरणाची माहिती असलेली पत्रक वाटप करून हा कार्यक्रम संपन्न झाला.
Tags
पनवेल