सिडको विरोधात शेतकऱ्यांचे सलग आठव्या दिवशी आमरण उपोषण सुरु; हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार-

सिडको विरोधात शेतकऱ्यांचे सलग आठव्या दिवशी आमरण उपोषण सुरु; हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार
पनवेल दि.१३ ( संजय कदम): नैना प्रकल्पाच्या विरोधात नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे वतीने सलग आठव्या दिवशी तालुक्यातील भूमिपुत्रांचे तुरमाळे गावासमोरील मैदानात आमरण उपोषण सुरु असून आज सकाळी यासंदर्भात सिडकोच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती परंतु या बैठकी नंतरही आंदोलनकर्ते आपल्या निर्णयावर ठाम असून हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्य शासन काय निर्णय घेते यावरच आंदोलनकर्ते आपली पुढील भूमिका ठरवणार आहेत.                        आज नैना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, मा. आमदार, जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे,शेकाप रायगड जिल्हा सरचिटणीस राजेश केणी, काँग्रेस ज्येष्ठ नेते आर. सी. घरत, जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक दीपक घरत, शेकापचे नेते काशिनाथ पाटील, परी मंडळ २ चे उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील आदींनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिग्गीकर व सह संचालक श्री. गोयल यांचेबरोबर चर्चा करून आंदोलनकर्त्यांची बाजू मांडत असताना नैना प्रकल्प रद्द करावा, यूटीसीपीआर लागू करावा, ग्रामविकास निधी मिळावा अशा मागण्यांवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. सदर चर्चेनंतर सिडको प्रशासनाच्या वतीने मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करू असे लेखी पत्राद्वारे सांगितले. तसेच या संदर्भात आपल्या भावना महाराष्ट्र शासनाकडे, नगरविकास खात्याकडे व संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखीपत्राद्वारे कळवत असून येत्या २७ तारखेला यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर बैठक लावून ठोस निर्णय घेऊ तरी तूर्तास आपण उपोषण मागे घ्यावे असे आवाहन त्यांनी या बैठकीत केले. त्यानंतर शिष्टमंडळ सिडको कार्यालय येथून उपोषण स्थळी निघून आले. व त्यांनी उपोषणकर्त्यानी चर्चा केली असता गुरुवारी या विषयासंदर्भात महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व शेकापचे आमदार भाई जयंत पाटील हे प्रश्न मांडणार असल्याने शासन या प्रश्नावर काय निर्णय घेत आहे यावर आपली पुढील भूमिका ठरवणार असल्याचे सांगून हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले. थोडे नवीन जरा जुने