पारगाव पुनर्वसन व पुर्नस्थापनेबाबत ग्रामस्थांनी आ.जयंत पाटील यांची भेट घेेवून केली चर्चा





पारगाव पुनर्वसन व पुर्नस्थापनेबाबत ग्रामस्थांनी आ.जयंत पाटील यांची भेट घेेवून केली चर्चा
पनवेल, दि.15 (संजय कदम) ः पनवेल जवळील पारगाव गावाच्या पुनर्वसन व पुर्नस्थापनेबाबत सखोल चर्चा येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नाईक यांनी आ.जयंत पाटील यांची नागपूर हिवाळी अधिवेशनात भेट घेवून मागण्यांचे पत्र सादर केले आहे.



या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पारगाव गावात माती भरणीचे कामे तीन वर्षापासून चालू आहेत. त्यामुळे पावसाळ्यात भरती येवून 30% घरांचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच पारगाव गावाची लेव्हल ही आता बनविलेल्या नाल्याच्या लेव्हल पेक्षा खाली आहे तरी ती वाढविणेे गरजेचे आहे. त्याचप्र्रमाणे येथील सांडपाण्याचा निचरा सुद्धा होत नाही. अनेक तळमजल्यावरील घरांंमध्ये पाणी शिरत आहे. विमानतळाच्या कामात होणार्‍या ब्लास्टींग मुळे गावातील 50% घरांना तडे गेले आहेत. तसेच प्रदुषणाचा त्रास होत आहे. त्यामुळे पुराचा धोका सुद्धा गावाला मोठ्या प्रमाणात आहेे. हीच अवस्था पारगाव डुंगी या गावाची झाली आहे. आगामी काळात ही दोन्ही गावे पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे वित्तहानी व जिवीतहानी होण्याची दाट शक्यता आहे. येथील भूमीपुत्रांनी आपल्या जमिनी विकासकामासाठी दिलेल्या आहेत. यावेळी शासनाने येथील भूमीपुत्रांच्या समस्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे. अनेक वेळा या संदर्भात शासनाच्या संबंधित खात्याशी ग्रामस्थांनी पत्रव्यवहार केला आहे


. असे असले तरी पारगाव गावाच्या पुनर्वसन व पुर्नस्थापनेबाबत कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत तसेच सकारात्मक भूमिका घेतली जात नही. तरी आ.जयंत पाटील यांनी या संदर्भात लक्ष घालून योग्य ते मार्गदर्शन करावे व शासन दरबारी आमची कैफियत मांडावी, अशी मागणी सुद्धा यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नाईक यांनी केली आहे.


थोडे नवीन जरा जुने