पनवेल दि.१६डिसेंबर (4K News): नैना प्रकल्प विरोधात आमरण उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांच्या उपोषणाच्या आजच्या दहाव्या दिवशी शिवसेना नेते, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याहस्ते उपोषणकर्ते अनिल ढवळे यांच्यासह सर्व १२ उपोषणकर्त्यांना नारळपाणी पाजून उपोषण मागे घेण्यात आले
यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विजय पाटील, नैना डेप्युटी कमिशनर सुकेशु पगारे, शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, मा आमदार जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, नैना समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर, मा नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, नारायणशेठ घरत, काँग्रेसचे आर.सी.घरत, सुदाम पाटील, शिवसेना विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, दीपक घरत, योगेश तांडेल, कॉम्रेड भूषण पाटील, प्रशांत पाटील, युवासेनेचे पराग मोहिते, शहर प्रमुख यतीन देशमुख, काशिनाथ पाटील, हेमराज म्हात्रे, आर्किटेक्त्त अतुल म्हात्रे यांच्या उपस्थितीत सदर उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी अनंत गीते यांनी शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त करीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात वापरण्यात आलेल्या शिर्षकामध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी बदल करताना राज्य सरकारने कितीही हात काढून घेण्याचा प्रयत्न केला तरी आता हे शक्य नाही, म्हणून आता शेतकऱ्यांची विजययात्रा ही राहणारच आहे मात्र यापुढे नैनाची अंतयात्रा निघेल, असा विश्र्वास शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केला. दहा दिवस सुरू असलेल्या आंदोलनामध्ये नैना समितीचे ॲड.सुरेश ठाकूर, माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह महाविकास आघाडी भक्कमपणे उभी राहिली. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यातच गेले तीन दिवस माजी आमदार बाळाराम पाटील यांनी नागपूर येथे अधिवेशन ठिकाणी जावून नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे आदींसह नेत्यांनी याविषयाला उपसून काढले.
या सर्व आमदारांनी सभागृहात प्रश्न लावून धरल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून सभागृहातच आश्र्वासित करण्यात आल्यामुळे उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. दरम्यान सिडकोचे एमडी अनिल डिग्गीकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये देखील त्यांनी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. या उपोषणाला अनेक संघटननी आपला पाठिंबा दर्शविला होता. तसेच महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या आंदोलनाचे जनक आणि नैना प्रकल्पग्रस्त ९५ गाव समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर यांनी या आंदोलनाची भूमिका विषद केली. गेली ११ वर्षे आम्ही नैना विरोधी शेतकऱ्यांना संघटित करीत आहोत. सुमारे ११० च्या वर आम्ही गाव बैठका घेतल्या आहेत. त्यानंतर नैना विरोधात ३ वेळा उपोषण करणारे अनिल ढवळे यांच्याशी चर्चा विनिमय केल्यानंतर उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. सिडकोच्या नैनाबबत भूमिकेचे स्पष्टीकरण देताना सविस्तर आकडेवारीची माहिती नागरिकांना दिली. यापूर्वी ही माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांना दिल्यानंतर तेही अचंबित झाले. याबाबतची उचित माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नव्हती. त्यामुळे नैना विरोधात गेलेल्या आंदोलनाची माहिती सिडको अधिकाऱ्यांमार्फत पोहोचली नाही. आता रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. याबाबत नैना विरोधात योग्य निर्णय घेतला तर येथील प्रकल्पग्रस्तांचा मोठा विजय असेल असा आशावाद ठाकूर यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर यापुढेही नैना विरोधी आंदोलन असेच पुढे सुरू राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. तर जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनीसुद्धा मागील आंदोलनात पालकमंत्र्यांनी योग्य मार्ग काढू असे आश्वासन दिले होते पण ते आज सहा महिने झाले तरी पूर्ण केले नाही असल्याचे सांगितले. तसेच माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी हा उपोषणकर्त्यांचा विजय आहे, मात्र सरकारमधील मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल साशंकता व्यक्त केली. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी बोलताना सांगितले की, नैना विरोधी संघर्ष करीत असताना आम्ही नेहमीच मोठमोठी आंदोलने करीत आलो आहोत. मात्र अनिल ढवळे यांनी सातत्याने नैनाच्या विरोधात आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आणि ते यशस्वी देखील झाले. आणि त्यांच्या प्रत्येक आंदोलनात महिलांचा सहभाग हा त्यांच्या आंदोलनाच्या यशाचे मुख्य कारण बनले आहे. त्यामुळेच यापुढे महिलांनी आपल्या हक्कासाठी असेच पुढे राहिले पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. नैना हटविण्याच्या मुख्य लढ्यात यापुढे शासनाला आपल्यापुढे नमविण्यासाठी आपण वज्रमूठ तयार केली आहे. आज ज्यापद्धतीने विधिमंडळात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभागृह गाजविले आणि नैना प्रकल्पग्रस्त उपोषणकर्त्यांच्या भावनांची कदर केली आहे. ज्या पद्धतीने विधिमंडळात राज्य सरकारच्या मंत्र्यांना सभागृहात आश्वासन देण्याची वेळ आली, या अर्थी आपले हे उपोषण नक्कीच यशस्वी झाल्याची भावना निर्माण होत आहे. येणाऱ्या काळात सरकारने नियोजित बैठकीमध्ये जर दिरंगाई केली तर मात्र सरकारला गराडा घालण्यासाठी आपल्याला सज्ज व्हावे लागेल, यासाठी आपल्याला तयारी करण्याची गरज आहे. यावेळी उपोषणकर्ते अनिल ढवळे यांनी देखील ९५ गावातील नागरिक हे न्याय न मिळाल्यास ९५ दिवस रस्त्यावर उतरून यशवंतराव चव्हाण मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग रोखण्यासाठी तयार असल्याचा इशारा देखील त्यांनी राज्य शासनाला दिला.
Tags
पनवेल