योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक...

कामोठे(4kNews) पनवेल महापालिका कार्यक्षेत्र तसेच पनवेल तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीबाबत पनवेल विधानसभा मतदार संघ क्षेत्र निहाय समितीची आढावा बैठक आज (दि. 29) पनवेल महापालिका मुख्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त संतोष वारूळे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद गोसावी, सदस्य सचिव तहसिलदार विजय पाटील, नायब तहसिलदार राजश्री जोगी, सदस्य मेघा दमडे, प्रज्ञा चव्हाण, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, मंगेश अडसूळ, महापालिका समाजविकास अधिकारी स्वप्नाली चौधरी, डेनयूलएम व्यवस्थापक विनया म्हात्रे, नवनाथ थोरात अभियंता गजानन देशमुख, महसूल विभाग अधिकारी उपस्थित होते 

          यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजनेची अमंलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी उपस्थितांकडून जाणून घेऊन त्यावर चर्चा केली. यावेळी काही महिलांचे बँक खाते जास्त दिवसापासून वापरात नसल्याने, आधार कार्डशी लिंक नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बँकांना मेलद्वारे सूचित करून लवकरात लवकर ही समस्या दूर करण्याबाबत उपस्थितांना सूचना दिल्या. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्र व पनवेल तालुक्यात आज पर्यंत एकुण १ लाख ५ हजार महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. कागदपत्राच्या अपुर्ततेमुळे ज्या महिलांचे अर्ज नामंजूर झाले होते. त्यांच्याशी फोनच्या माध्यमातून संवाद साधून त्यांचे अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली. यावेळी आदिवासी पाड्यावरील महिलांना मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ देताना येणाऱ्या अडचणी आमदार महोदयांनी समजून घेऊन, या अडचणी सोडविण्यावरती उपस्थितांशी चर्चा करण्यात आली.

        मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजनेबरोबर महापालिका कार्यक्षेत्र व पनवेल तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ योजना व मुख्यमंत्री वयोश्री योजनेचाही आढावा यावेळी घेण्यात आला. उपायुक्त वारूळे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महापालिका कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. या योजनेअंतर्गत महापालिकेतील विविध विभागात ५२ युवकांना संधी दिल्याचे सांगितले. तसेच महापालिका कार्यक्षेत्रातील एमआयडीसी, तसेच २० पेक्षा जास्त मनुष्यबळ असलेल्या व तीनवर्षापेक्षा जास्त वर्षापासून काम करत असलेल्या विविध कंपन्या, बँका, बांधकाम क्षेत्रांमध्ये प्रशिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देण्याबाबत आस्थापनांशी संवाद सुरू असल्याची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा आढावा घेताना मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी आजपर्यंत ८ हजार ६५५ नागरिकांनी या योजनेंतर्गत अर्ज भरल्याची माहिती दिली. आशा सेविकांच्या मार्फत जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यत ही योजना पोहोचली जात असल्याची माहिती दिली.मुख्यमंत्री वयोश्री योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी अशीही सूचनाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. 

थोडे नवीन जरा जुने