पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नियुक्त करण्यात आलेल्या फिरते निगराणी आणि स्थिर देखरेख पथकाने गेल्या 15 दिवसांमध्ये बेकायदेशीररित्या रक्कम नेली जाणारी 3 वाहने पकडून त्यातून तब्बल 1 कोटी 14 लाख 57 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. त्याशिवाय नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाची तस्करी करणारे, बेकायदा मद्य बाळगणारे आणि विकणारे, तसेच बेकायदा शस्त्र बाळगणार्या आणि त्याची विक्री करणार्यांवर देखील धडक कारवाई केली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि उरण या 4 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सदर 4 विधानसभा क्षेत्रात निवडणुकीच्या कालावधीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘निवडणूक आयोग’कडून लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये तसेच आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत फिरते निगराणी पथक (एफएसटी) तसेच स्थिर देखरेख पथक (एसएसटी) नियुक्त करण्यात आले आहेत. या पथकाच्या माध्यमातुन बेकायदेशीरपणे नेली जाणारी मोठी रोकड, अंमली पदार्थ, अवैध मद्यसाठा आणि मद्याची वाहतूक करणार्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. 15 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत फिरते आणि स्थिर देखरेख पथकाने 3 वेगवेगळ्या कारवायांमध्ये रोख रक्कम घेऊन जाणारी 3 वाहने पकडून त्यातून 1 कोटी 14 लाख 57 हजाराची रक्कम पकडली आहे. सदरची रोख रक्कम कोषागारात जमा करण्यात आली असून या रोख रक्कमेबाबत आयकर विभागाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
बेकायदा शस्त्र जप्त...
नवी मुंबई पोलिसांनी निवडणूक आचारसंहितेच्या काळात अवैध शस्त्र बाळगणार्यांची देखील धरपकड केली असून आतापर्यंत पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणार्यांविरोधात 16 गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे 16 शस्र जप्त केले आहेत. यात 2 पिस्टल, तसेच 4 जिवंत काडतुस जप्त केले आहेत. त्याचप्रमाणे तलवार, चॉपर, सुरा, चावू यासारखी 14 हत्यारे देखील जप्त करण्यात आली आहेत.
बेकायदा मद्य विव्रेत्यांवर कारवाई...
निवडणुकीच्या काळात दारुची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री केली जाते. दारुच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाया सुरु आहेत. अतापर्यंत नवी मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारुन दारु विव्रेत्यांवर तसेच गावठी हातभट्टीची दारु गाळणार्यांवर 127 कारवाया केल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करुन 8 लाख 19 हजार रुपये किंमतीची 2470.09 लिटर दारु जप्त केली आहे. त्याचप्रमाणे गुटखा आणि पानमसाला विक्री-वाहतूक करणार्यांविरोधात 10 कारवाया करुन 10 लाख 25 हजार 219 रुपये किंमतीचे 10060 गुटख्याचे पाऊच जप्त केले आहेत. त्याशिवाय पोलिसांनी या कारवायांमध्ये 1 चार चाकी आणि 2 दुचाकी वाहने तसेच दारु बनविण्यासाठी लागणारे साहित्य, रोख रक्कम, 42 मोबाईल फोन आणि 1 लॅपटॉप सुध्दा जप्त केला आहे.
अंमली पदार्थ विरोधी कारवाई...
नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि पोलीस ठाणे स्तरावर अंमली पदार्थाची तस्करी, सेवन करणार्यांविरोधात देखील मोठी कारवाई केली असून आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांनी आतापर्यंत अंमली पदार्थ तस्करीच्या 18 कारवाया केल्या आहेत. यात 1 कोटी 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 410 ग्रॅम वजनाचे कोकेन, 28 लाख 47 हजार 500 रुपये किंमतीचे 124.10 ग्रॅम एमडी तसेच 8 लाख 28 हजार 350 रुपये किंमतीचे 34.82 ग्रॅम वजनाचे हेरॉईन, तर 8 लाख 95 हजार रुपये किंमतीचा 35.42 ग्रॅम वजनाचा गांजा असे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
Tags
पनवेल