पनवेल, दि.11 (संजय कदम) ः ओला, उबेर कार किंवा रिक्षा भाडे तत्वावर ऑफलाईन बुक करून निर्जनस्थळी लघवीच्या बहाण्याने उतरुन संबंधित चालकाच्या गळ्यावर चाकून ठेवून गाडीचा ताबा घेवून गाडीसह त्याल लुटून पळून जाणार्या दोघा सराईत गुन्हेगारांना तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून आतापर्यंत 4 गुन्हे उघडकीस करण्यात आले आहेत.
तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचे दोन गुन्हे त्याचप्रमाणे पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा व कल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि प्रवीण भगत, पो.नि.गुन्हे निकम, पो.उपनिरीक्षक धुळगंडे, पो.हवा.मढवी, शिंदे, सावंत, पाटील, पोलीस कॉस्टेबल जाधव आदींच्या पथकाने या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या आधारे अधिक माहिती घेतली असता
या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सागर गोयल (25 रा.कल्याण) व त्याचा सहकारी संतोष नाटेकर (27 रा.कल्याण) हे हाजीमलंग कल्याण परिसरात लपल्याची माहिती मिळताच त्यांनी सलग तीन दिवस त्या ठिकाणी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून आतापर्यंत 2 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यातील सेलेरिओ गाडी हस्तगत करण्यात आली आहे. या आरोपींमुळे अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Tags
पनवेल