तेजस डाकी यांची झंझावाती पत्रकार परिषद; विरोधकांचा घेतला खरपूस समाचार



...आता महेश बालदी कसे आमदार होतात तेच मी पाहतो ! असे धडधडीत आणि निर्भीड वक्तव्य उरणचे समाजसेवक तेजस डाकी यांनी केले आहे. दिनांक ५ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला तर उरणकरांची लाडकी बहीण श्रीकन्या ताई डाकी या तब्बल २५ हजार मतांनी १००% निवडून येतील, असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी तेजस डाकी यांनी विरोधी उमेदवार आमदार महेश बालदी, प्रितम म्हात्रे आणि मनोहरशेठ भोईर यांच्यावर चांगलीच तोफ डागली.
सर्वत्र राजकारणाचा चिखल झाला आहे, कोणत्याही पक्षात जाण्याची इच्छा तरुणाई मधून दिसून येत नाही त्यामुळेच अपक्ष लढत असल्याचे तेजस डाकी यांनी सांगितले...  समाजकार्यातून राजकारणात जाण्याच्या प्रवासात जुने राजकीय सहकारी, भावाप्रमाणे असलेला मित्र परिवार आपल्या बाजूने मजबूत उभा असल्याचे तेजस डाकी यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी श्रीकन्या ताई डाकी यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे अधोरेखित केले. घरोघरी जाऊन अनेक महिलांना श्रीकन्या ताई भेटत असून महिला भगिनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.

उरणच्या अनेक प्रलंबित प्रश्नावर तेजस डाकी यांनी यावेळी कटाक्ष टाकला. JNPTचा CSR फंड तालुक्यात वापरला जात नसून त्याचा उपयोग बाहेर केला जातोय असा आरोप त्यांनी यावेळी केला. केंद्र सरकारने केलेली कामे सत्ताधारी आमदार आपल्या नावावर खपवत आहेत. मात्र ते सर्व केंद्राचे प्रोजेक्ट आहेत असे तेजस डाकी यांनी सांगितले. त्यामुळेच ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधक सर्व नेते फेकंफेक करण्यात मात्तबर आहेत अशी टीका त्यांनी यावेळी केली. नवी मुंबईचा सीवूड्स मॉल जर उरणला असता तर तो देखील आपणच बांधला असेही उरणच्या आमदारांनी रेटून सांगितले असते, असेही ते म्हणाले.

आमदार महेश बालदी यांनी आगरी कोळी कराडी समाजाची अवहेलनाच केली, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. दिबा पाटीलांचे नाव एअरपोर्टला देण्यात राजकारण सुरु आहे. आता महेश बालदी कसे आमदार होताहेत ते आपण पाहणार असल्याचे तेजस डाकी यांनी म्हंटले आहे. उरणच्या जनतेला अटल सेतू सारख्या मोठ्या योजना नकोत त्यांना मूलभूत सुविधा हव्यात अशा नागरिकांच्या समस्या तेजस डाकी यांनी यावेळी मांडल्या. याच समस्या सोडवण्यासाठी आपल्या पत्नी श्रीकन्या डाकी निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.

उरणमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न उध्दभवला त्याचवेळी आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता. आताच्या महिला सुशिक्षित झाल्या आहेत. त्यांना गृहीत धरणं सोडून द्या... असा इशाराच तेजस डाकी यांनी महेश बालदी यांना दिला आहे. शेकाप नेते एअरपोर्टमध्ये नोकरीचे आमिष देतात मात्र त्यांच्याच कंपनीत कामगार खुश आहेत का हे त्यांना विचारा... त्यांनी आधी त्यांचे डेपोसिट वाचवावे असा टोला तेजस डाकी यांनी विरोधी उमेदवाराला लगावला आहे. 

उरणचे नेते मॅनेज झाले आहेत. त्यांचे अंतर्गत व्यावसायिक संबंध आहेत. त्यामुळे कोणीही अन्यायाविरुद्ध बोलायला तयार नाही असे डाकी म्हणाले आहेत.  शेकापचे कार्यकर्ते बंडखोरांना स्वीकारत नाहीत. हा शेकापचा इतिहास आहेत. त्यामुळे माझी तिन्ही विरोधकांसोबत स्पर्धा नाही असे तेजस डाकी यांनी स्पष्ट केले आहे. समाजसेवेचा वारसा घेऊन आपण निवडणूक लढवत असून उरणची लाडकी बहीण श्रीकन्या डाकी यांना मतदार २५ हजार मतांनी लीड देऊन १००% निवडून आणतील असा विश्वास पत्रकार परिषदेत समाजसेवक तेजस डाकी यांनी व्यक्त केला.
थोडे नवीन जरा जुने